Homeसामाजिकअहिल्यादेवींच्या जयंतीनिमित्त चौंडीमध्ये २ दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

अहिल्यादेवींच्या जयंतीनिमित्त चौंडीमध्ये २ दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसह दिग्गजांची मांदियाळी

अहिल्यानगर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१व्या जयंतीनिमित्त श्रीक्षेत्र चोंडी येथील पावन भूमित यंदा अभूतपूर्व आणि दिमाखदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून ३० व ३१ मे २०२६ रोजी होणाऱ्या उत्सवाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळातील दिग्गज मंत्री, लोकप्रतिनिधी आणि लाखो भाविकांच्या उपस्थितीत हा ऐतिहासिक क्षण पार पडणार आहे.

अहिल्यानगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी या भव्य जयंती उत्सवाची अधिकृत माहिती दिली. उत्सवाच्या पहिल्या दिवशी, ३० मे रोजी रात्री ८ ते ११ या वेळेत कवी डॉ. कुमार विश्वास यांच्या कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख उपस्थिती लावणार आहेत. काव्यरसिकांसाठी हा कार्यक्रम पर्वणी ठरणार असून हजारो श्रोत्यांची उपस्थिती अपेक्षित आहे. यानंतर रात्री ११ वाजता पुण्यलोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्यावर आधारित भव्य ड्रोन शो सादर केला जाणार आहे. आकाशात साकारल्या जाणाऱ्या ऐतिहासिक दृश्यांमुळे चोंडीचा आसमंत उजळून निघणार आहे. रात्री ठीक १२ वाजता नेत्रदीपक फटाक्यांच्या आतिषबाजीने जयंती उत्सवाचा जल्लोष शिगेला पोहोचणार आहे.

३१ मे रोजी सकाळी चोंडी येथील शिल्पसृष्टी विकासकामांचे भूमिपूजन होणार आहे. या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री पंकजाताई मुंडे, शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे, दत्तात्रय भरणे, अतुल सावे यांच्यासह राज्यातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे चोंडी येथे राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील दिग्गजांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे. या सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो भाविक उपस्थित राहण्याची शक्यता असून प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments