कोल्हापूर / हातकणंगले:
जिल्ह्यात एक अत्यंत खळबळजनक प्रकार उघडकीस आला असून, प्रेमाच्या जाळ्यात ओढून सुमारे १५ हून अधिक तरुणींचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुलाची शिरोली येथील शाहीद समीर सनदी (वय २२) याला पोलिसांनी अटक केली असून, त्याचे काळे कृत्य आता चव्हाट्यावर आले आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणातील संशयिताचा एक व्हिडीओ सध्या समोर आला असून, त्यामध्ये तो आपल्या कृत्याबद्दल माफी मागताना दिसत आहे.
नेमकं प्रकरण काय?
हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली येथील रहिवासी असलेला शाहीद सनदी हा फार्मसीचे शिक्षण घेत आहे. त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून १८ ते २२ वयोगटातील अनेक तरुणींशी मैत्री केली. त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून कोल्हापूर आणि शिरोली परिसरातील लॉजवर नेऊन त्यांच्यावर अत्याचार केले. धक्कादायक बाब म्हणजे, अत्याचार करताना त्याने या तरुणींचे अश्लील चित्रण केले आणि ते व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन अनेक महिने त्यांचे मानसिक व शारीरिक शोषण केले.एका २० वर्षीय पीडित तरुणीने धाडस दाखवून राजारामपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर या संपूर्ण ‘रॅकेट’चा पर्दाफाश झाला.
माफी मागतानाचा व्हिडीओ आला समोर
या प्रकरणातील गांभीर्य वाढवणारी बाब म्हणजे संशयित आरोपीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तो आपल्या गुन्ह्याची कबुली देत माफी मागताना दिसत आहे. मात्र, इतक्या मोठ्या प्रमाणावर तरुणींचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या या नराधमाला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी आता सर्व स्तरातून होत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला असून, यामागे एखादी मोठी संघटित टोळी आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.
शिरोलीत संतापाची लाट; आज ‘गाव बंद’
या घटनेचे पडसाद संपूर्ण जिल्ह्यात उमटले असून, शिरोली परिसरात प्रचंड तणाव आणि संतापाचे वातावरण आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज मंगळवारी ‘शिरोली बंद’ची हाक देण्यात आली आहे. विविध संघटनांनी पोलीस प्रशासनाला निवेदन दिले असून, या प्रकरणाचा तपास जलदगतीने करण्याची मागणी केली आहे.
पोलिसांचे आवाहन
अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. “जर अजून कोणाची अशा प्रकारे फसवणूक झाली असेल, तर त्यांनी न घाबरता पुढे येऊन तक्रार करावी, पीडित तरुणींचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवले जाईल,” असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
ब्युरो रिपोर्ट, एबी टाइम्स २४ (Abtimes24.com)



